जनसंपर्क न्यूज – ( सोलापूर ) मनसेच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा किती थापा मारल्या ते मोजा असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाच्या टीकेला उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी आज सोलापुरात सभा घेतली या सभेत त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. मोदी एक चांगला पर्याय असतील असं वाटलं होतं पण आता वाटू लागलं आहे की यांच्यापेक्षा काँग्रेस आणि आघाडीचंच सरकार चांगलं आहे असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. माझ्या सभांची आणि खर्चांची चिंता करू नका त्यापेक्षा मारलेल्या थापा मोजा असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला उत्तर दिलं.

आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण, पुलवामा प्रकरण, एअर स्ट्राईक हे मुद्दे बाहेर काढले जात आहेत. जाती-पातीचं राजकारण हे सरकार करताना दिसतं आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असं आश्वासन दिलं होतं. पाच वर्षात १० कोटी रोजगार मिळाला का? झालं काय? पंतप्रधानांना झटका आला आणि नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीमुळे साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या झाल्या. हा अधिकृत आकडा आहे, अनधिकृत आकडा समोर आलेला नाही. एका चुकीच्या निर्णयामुळे हे घडलं आहे तरीही अच्छे दिन आले असं म्हणायचं का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. हे कोणतेच प्रश्न विचारू नये म्हणून हे सरकार दंगली घडवत आहे. जातीपातीच्या नावाने भांडणं लावायची. जनतेने भांडावं आम्ही पाच वर्षे तरून जातो हेच या सरकारचं धोरण आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रात कोणत्याही उद्योगात जर मराठी मुलांना काम मिळालं तर आरक्षणाची गरजच उरणार नाही. मात्र बाहेरचे लोक येत आहेत आणि नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी घेऊन जात आहेत. मात्र भरती होते ती सांगितलेच जात नाही कारण तुमची माथी भडकवण्याचं काम हे सरकार करतं आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आरक्षणाचा पाढा वाचला जातोय मात्र सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी आपल्या भाषणात उपस्थित केला. सरकारी नोकऱ्या अवख्या चार-पाच टक्के उरल्या आहेत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही तुम्हाला फक्त आमिषं दाखवली जात आहेत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.