चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील अनधिकृत घरांचा प्रश्न आणि त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा विषय हा माझ्या अखत्यारीतील असून तो मीच सोडवू शकतो, असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे. प्रभाग १७ मधील नागरिकांना योग्य तो दिलासा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील.”
यावेळी त्यांनी माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या कार्याचाही उल्लेख केला. भाऊसाहेब भोईर यांचे वडील स्व. सोपानराव भोईर हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर होते. त्यांच्या कुटुंबाला महापालिका प्रशासनाचा मोठा अनुभव असून त्याचा फायदा प्रभागातील विकासकामांना झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये रस्ते विकास, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीत भाऊसाहेब भोईर यांनी सातत्याने आणि प्रभावीपणे काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
“स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि भाऊसाहेब भोईर यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांमध्ये अनधिकृत घरांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आशा निर्माण झाली असून, लवकरच ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











































