जनसंपर्क न्यूज – पुणे : पुणे महानगरपालिका च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील काही शाळांबाबत महत्त्वाचे आवाहन करत पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील तपासणीत तब्बल १३ शाळा अनधिकृत असल्याचे उघड झाले असून, येत्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षात या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
❗ अनधिकृत शाळांची यादी
प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शाळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
- न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, बिबवेवाडी
- महात्मा गांधी प्रशाला, येरवडा
- टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, कोंढवा खुर्द
- सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक
- इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महमंदवाडी रोड, हडपसर
- आकांक्षा ॲकॅडमी स्कूल, लोहगाव
- एलोरा मेडिकल ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल, मानाजी नगर
- लेगसी हाय स्कूल, कोंढवा बुद्रुक
- शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, कोंढवा बुद्रुक
- ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री
- ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट – इकरा इस्लामिक स्कूल, कोंढवा
- ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, आंबेगाव बुद्रुक
- आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री
📢 पालकांसाठी महत्त्वाचे आवाहन
महापालिकेने पालकांना स्पष्टपणे सांगितले आहे की,
- शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी तिची अधिकृत मान्यता तपासा
- शाळेची नोंदणी व परवानगी संबंधित शिक्षण विभागाकडून खात्री करा
- कोणत्याही आकर्षक जाहिरातींना भुलू नका
अधिकृत शाळांची संपूर्ण माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून दिली जाणार असून, आवश्यक असल्यास पालकांनी थेट विभागाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
शहरात शिक्षणाच्या नावाखाली अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर कठोर कारवाई सुरू असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.











































