निसर्गाशी सुसंगत राहून जलस्रोतांचे जतन करणे ही काळाची गरज – घैसास

89

जनसंपर्क न्यूज – पुणे : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यातील पुणे, नंदुरबार, वाशिम, गडचिरोली अशा विविध जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. जंगल परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या ओढ्यांवर आणि ओघळांवर स्थानिक शेतकरी व आदिवासी बांधवांनी एकत्र येत दगड, माती आणि सिमेंटच्या पोत्यांच्या साहाय्याने छोटे बंधारे उभारले.

या उपक्रमामुळे वाहून जाणारे पाणी एका ठिकाणी साठवले जात असून, परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होत आहे. तसेच पाण्याची उपलब्धता वाढल्याने जंगलातील जैवविविधतेला मोठा आधार मिळत आहे. पाणी साठवणुकीमुळे विविध वनस्पतींची वाढ होऊन पशु-पक्षी व जलचरांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होत आहे. परिणामी, पर्यावरण संवर्धनासह स्थानिक शेती व्यवस्थेलाही याचा थेट फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पारंपरिक ज्ञान आणि सामूहिक श्रम यांच्या बळावर उभारण्यात आलेले हे बंधारे पर्यावरणपूरक आणि टिकाऊ ठरत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागात जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रयत्न इतरांसाठी ही प्रेरणादायी ठरत आहे.

सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास व स्मिता घैसास आणि कार्याध्यक्ष शलाका घैसास यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “निसर्गाशी सुसंगत राहून जलस्रोतांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण रक्षणास चालना मिळते.”