जनसंपर्क न्यूज – पुणे : संगीतप्रेमींसाठी ‘दिशा’ यांच्या वतीने “सुवर्णकाळातील शलाका” हा विशेष संगीत कार्यक्रम बालशिक्षण भवन येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि त्यांच्या अजरामर गीतांवर आधारित या मैफलीने उपस्थित रसिकांना सुरेल आठवणींच्या दुनियेत नेले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना अर्पण करण्यात आलेली स्वरमयी आदरांजली. त्यांच्या अजरामर गाण्यांमधून सादर झालेली ही श्रद्धांजली रसिकांच्या मनाला भिडणारी ठरली.

मैफलीत ‘दिल चीज क्या है’, दुनिया मे लोगों को, जाने जा, जीवन पे हर मोड पर, निगाहे मिलाने को, ‘ये रात भीगी भीगी’, ‘इस मोड़ से जाते हैं’, ‘रुक जा रात ठहर जा रे चंदा’, ‘आप के हसीन रुख पे’, ‘पिया तोसे नैना लागे रे’ तसेच ‘कौन है जो सपनों में आया’ अशी अनेक अजरामर गीते सादर करण्यात आली. गझल, ठुमरी, प्रेमगीते आणि विरह गीते अशा विविध प्रकारांनी कार्यक्रमाला बहार आली आणि श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.

या मैफलीत सुप्रसिद्ध गायिका शलाका घैसास यांनी आपल्या सुरेल व भावपूर्ण आवाजाने रसिकांची मने जिंकली. तसेच गायक अजय राव, प्रसाद केळकर आणि अतुल किल्लेदार यांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली. प्रत्येक गाण्यातील भावनांची अचूक अभिव्यक्ती आणि सुरांची नेमकी मांडणी यामुळे कार्यक्रम अधिक उठावदार ठरला. कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन शलाका घैसास यांनी केले होते, तर निवेदनाची धुरा मनीष गोखले यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या माहितीपूर्ण आणि बहारदार निवेदनामुळे प्रत्येक गाण्यामागील संदर्भ रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

वाद्यसंगतीसाठी अमन सय्यद, ओंकार पाटणकर, हार्दिक रावल, विशाल गंड्रतवार, संजय खाडये आणि चारू किंजवाडकर यांनी दिलेली साथही उल्लेखनीय ठरली. त्यांच्या सुरेल साथसंगतीमुळे कार्यक्रम अधिक समृद्ध झाला.