मा. आमदार अश्विनी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ‘नमो महाआरोग्य शिबिराच्या आयोजन

105

जनसंपर्क न्यूज – पिंपरी–चिंचवड प्रतिनिधी : मा. आमदार अश्विनी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एक बहुमोल आरोग्यपूर्तीचा उपक्रम चिंचवड परिसरात राबविण्यात येत आहे. स्वीकृत नगरसेवक विठ्ठल बबन भोईर आणि पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या पुढाकारातून ‘नमो महाआरोग्य शिबिर’ दिनांक १५ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले असून, नागरिकांच्या आरोग्यविषयक सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे शिबिर आठवडे बाजार, मोरया गोसावी स्टेडियम, गोयल गरिमा सोसायटी शेजारी, केशवनगर, चिंचवड येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या शिबिरात आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, माधवबाग आणि डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज यांचा सहभाग असून, विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे.

शिबिरात जनरल हेल्थ चेकअप, बीपी–शुगर–बीएमआय तपासणी, प्राथमिक वैद्यकीय सल्ला, बालरोग तपासणी, पोषण मार्गदर्शन, डोळ्यांची तपासणी, हृदय जोखीम मूल्यांकन, स्ट्रेस टेस्ट, लठ्ठपणा सल्ला, आहार तक्ता, हाडांची घनता (BMD) तपासणी अशा अनेक तपासण्यांचा समावेश आहे. महिलांसाठी विशेष तपासणी, ४५ वर्षांवरील महिलांसाठी मॅमोग्राफी आणि ओरल कॅन्सर तपासणीसह दंतचिकित्सा सेवा देखील दिल्या जाणार आहेत.

तसेच रक्तदान शिबिर, अवयव दान जागरूकता मोहीम, व्यायाम तक्ता, फिटनेस सल्लामसलत आणि मोटापामुक्त भारत अभियान या उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.“आरोग्य हीच खरी संपत्ती असून समाजातील प्रत्येक व्यक्ती सक्षम असावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,” असे श्री. विठ्ठल भोईर यांनी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.