‘निष्ठा की विश्वासघात?’ प्रश्नाने पिंपरी-चिंचवड राजकारण तापले; भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला

98

जनसंपर्क न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असून अवघे काही तास शिल्लक असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरबुरींमुळे निवडणुकीच्या तोंडावर नवे वळण मिळाले आहे. आमदार शंकर जगताप आणि माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यातील दीर-वहिनीचा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधून भाजपने ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर हा वाद उफाळून आला. माऊली जगताप हे प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक २९ मधील रहिवासी असल्याने “आयात उमेदवार नको” अशी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आधीपासूनच होती. मात्र उमेदवारीचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवल्याने अधिकच असंतोष निर्माण झाला.

दरम्यान, माऊली जगताप यांनी सोशल मीडियावर गुलालात माखलेला फोटो शेअर करत “१५ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज साकार झालं” असा भावनिक संदेश पोस्ट केला. याच पोस्टवरून माजी आमदार अश्विनी जगताप यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ असा थेट सवाल उपस्थित करत माऊली जगतापांवर आणि अप्रत्यक्षपणे शंकर जगतापांवरही निशाणा साधला.

दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा उल्लेख करत अश्विनी जगताप यांनी “ज्यांच्या छत्रछायेखाली ओळख मिळाली, त्यांच्याच जागी दुसऱ्याला पाहण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे नमकहरामी” असा आरोप केला. मतदानाच्या काही तास आधी करण्यात आलेल्या या पोस्टमुळे लक्ष्मण जगताप समर्थकांच्या भावना तीव्र झाल्या असून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

या साऱ्या घडामोडींमुळे प्रभाग ३१सह संपूर्ण शहरात राजकीय चर्चांना उधाण आले असून याचा मतदानावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.