बाळकृष्ण गुरव याज कडून – मसूरः कराड तालुक्यातील मसूर रेल्वे स्टेशन च्या पूर्व पश्चिम भागात वाहतुकीसाठी पर्याय मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने कोणेगाव -कवठे- कांबिरवाडी- वडोली भिकेश्वर -मसूर या गावातील शेतकरी व अन्य प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाजूला कोट्यावधी रुपये खर्च करून पर्यायी भुयारी मार्ग तयार करण्यात आला असून त्याचे काम पूर्ण झाले आहे मात्र हा मार्ग प्रत्यक्षात कधी सुरू होणार? असा सवाल उपस्थित होत आहे सध्या हा पूर्ण झालेला मार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला पर्याय मार्ग तातडीने खुला करावा अशी आसपासच्या गावकऱ्यांची मागणी आहे.
( रेल्वे प्रशासनातर्फे पूर्ण झालेला बोगदा )
सदर भुयारी मार्गाचे काम दोन्ही बाजूने पूर्ण झाले आहे भुयारी मार्ग सुद्धा पूर्ण झाला आहे परंतु हा पुल वाहतुकीसाठी कधी खुला होणार असा सवाल कोणेगाव -कवठे- कांबिरवाडी- वडोली भिकेश्वर -मसूर या गावातील ग्रामस्थ करत आहेत कवठे ,कोणेगाव या गावातील ग्रामस्थांना मसूरला जाण्यासाठी येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून याचा वापर होऊ शकतो कवठे गावच्या ग्रामस्थांना रेल्वेच्या उड्डाण पुलावरून जात असताना सुमारे अर्धा किलोमीटर वळून पुलावरून मसूर बाजूकडे जावे लागते तर मसूरकडून येताना सुद्धा उजव्या बाजूला वळून गावाकडे येताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर या मार्गावरून चांगल्या पद्धतीने दळणवळण होऊ शकते रेल्वेच्या उड्डाण पुलावरून मसूर कडून कवठेकडे व कोणेगाव कडे वळसा घेऊन येताना तिन्ही बाजूचा अंदाज घ्यावा लागतो पाठीमागून एखादे वाहन येते का ?समोरून एखादे वाहन येते का? खालच्या बाजूने वहाण येते का? अशा पद्धतीने डोळ्यात तेल घालून प्रवास करावा लागत आहे या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत ,अनेकांना जायबंदी व्हावी लागले आहे तरी रेल्वे प्रशासनाने या भुयारी मार्गाची पाहणी करून सदरचा भुयारी मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे.
मसूर -उंब्रज रस्त्यावर भव्य दिव्य उड्डाणपूल बांधला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विना अडथळा सुरू झाली आहे परंतु भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिरंगाई का लावली आहे.हा भुयारी मार्ग सुरू झाल्यास चारही गावांतील शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यास, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करण्यास तसेच दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र प्रत्यक्षात मार्ग बंद असल्याने नागरिकांना आजही लांबचा, वेळखाऊ व धोकादायक पर्यायी मार्ग वापरावा लागत असून आर्थिक नुकसानीसह जीवितासही धोका निर्माण झाला आहे.

( मसूर रेल्वे स्टेशन व मसूरकडे जाण्यासाठी तयार असलेला परंतु वाहतुकीसाठी बंद असलेला भुयारी मार्ग )
पावसाळा तोंडावर असताना हा मार्ग तातडीने सुरू होणे गरजेचे असताना, पूर्ण झालेल्या कामाकडे रेल्वे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे. केवळ औपचारिक उद्घाटनासाठी नागरिकांचा कोंडमारा सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रेल्वे प्रशासनाने तात्काळ हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही कवठे, कोणेगाव, कांबिरवाडी व मसूर येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून देण्यात आला आहे.







































