संस्थेची स्थापनाविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोव्यातील होतकरू तरुणांनी शिक्षणासाठी आणि चरितार्थासाठी मुंबईची वाट धरली. मुंबईतले वेगळे वातावरण,भाषा, जवळची माणसे दूर असल्याने झालेली जीवाची घालमेल याचा तरुण मंडळींच्या मानसिकतेवर परिणाम होत होता, एकाकीपणा जाणवत होता. यावर तोडगा काढण्यासाठी तरुण मंडळींच्या मनात संघटित होण्याचे विचार घोळू लागले आणि सखोल विचार विनिमय होऊन एक हस्तपत्रक तयार करण्यात आले. आमंत्रक म्हणून बळवंतराव ग. जक, विष्णू श्री. बोरकर, अनंत द. आमोणकर, व शेषगिरी गायतोंडे यांच्या नावाने वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली व गिरगांव येथील मराठा हायस्कुलात, २४, ऑगस्ट १९१९ रोजी वामनराव उर्फ आबासाहेब केरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली आणि द गोवा हिंदू असोसिएशन या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
संस्थेची उदिष्टे
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हे उपक्रम संस्थेची उद्दिष्टे आहेत. संस्थेमुळे गोमंतकीयांना स्वत:ची अशी ओळख निर्माण झाली. चिराबाजार मधील ‘माला इमारत ‘ , चर्नीरोडवरची ‘ सुरतवाला इमारत’, मोहन इमारत’, मेहता मेंशन’ असा प्रवास करत १९५९ साली संस्था डॉ. दादासाहेब भडकमकर मार्गावरील वकील टेरेस म्हणजे आजच्या ‘गोमंतधाम’ या इमारतीत स्थिरावली.
सामाजिक उपक्रम
सुरवातीच्या काळात संस्थेच्या प्रचारासाठी, कार्यकर्ते मिळवण्यासाठी, विविध समित्यांची स्थापना केली गेली. प्रदर्शने, वार्षिक सहली, वगैरे कार्यक्रम केले गेले पण एवढ्यावरच संस्थेचे कार्य थांबले नाही. आजही माणुसकीच्या तत्वावर फक्त गोमंतकीयांनाच नव्हे तर जाती- धर्म निरपेक्ष गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत दिली जाते. संस्थेने मेडी-हेल्प आणि जीवन- साहाय्य या दोन पुस्तिका गरजू रुग्णांसाठी प्रकाशित केल्या आहेत त्यांत रुग्णांना मदत देणाऱ्या संस्थांपासून हॉस्पिटल्स, वृद्धाश्रम, आणि इतर उपयुक्त माहिती उपलब्ध आहे.
शैक्षणिक उपक्रम
देशाचा उत्कर्ष समाजाच्या प्रगतीवर अवलंबित असतो. समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाची आवश्यकता असते हे संस्थेच्या कार्यकारी मंडळाने जाणले. तसेच शिक्षणामुळे, संस्कारामुळे माणूस घडतो, हे लक्षांत ठेऊनच संस्थेतर्फे आर्थिक दृष्ट्या गरजू पण हुशार आणि होतकरू गोमंतकीय विद्यार्थांना पदवीपर्यंत शिष्यवृत्या दिल्या जातात.
पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या सुरु केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थाना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिके दिली जातात. तसेच वैद्यकीय पुस्तकांचा संग्रह, मराठी वाचनालय, संदर्भ ग्रंथालय अशी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत संस्थेची कार्ये आहेत.सांस्कृतिक उपक्रम
गोमंतकीय माणूस हा मुळातच नाट्य-कलाप्रेमी. १९५५ साली संस्थेच्या हौशी कलाकारांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ‘खडाष्टक ‘ हे नाटक सादर करून पहिले पारितोषिक मिळवले आणि त्या नंतर मागे वळून पहिले नाही. १९५६ साली दसऱ्याच्या मुहुर्तावर नाट्य आली ललित कलांच्या विकासासाठी कलाविभागाची स्थापना झाली. १९५५ ते २०१७ पर्यंत कलाविभागातर्फे संस्थेने एकूण ४५ नाटकांची निर्मिती केली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘सं मत्स्यगंधा’, ‘नटसम्राट’, ‘लेकुरे उदंड जाली’ , ‘बॅरिस्टर’ , ‘संध्याछाया’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी ‘, ‘स्पर्श’ , आणि इतर आशयघन नाटके सादर करून देश- परदेशात मान्यता मिळवली. २०१७ साली संस्थेने ‘सं मत्स्यगंधा’ नाटकाची पुनर्निर्मिती केली. श्री अवधूत गुडे, श्री रामकृष्ण नाईक, श्री भिकू पै आंगले, श्री देवदत्त मणेरीकर, श्री सतीश म्हापसेकर,, दामू केंकरे, दुर्गाराम शिरोडकर,, प्रफुलला डहाणूकर, मोहनदास सुखटणकर व इतर कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे, निस्वार्थी, निरलस सेवेमुळे कलाविभाग प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊ शकला.
त्याचप्रमाणे,गोपीनाथ सावकार, मास्टर दत्ताराम, डॉ. विजया मेहता, दामू केंकरे, विजय केंकरे, पं. जितेंद्र अभिषेकी, आशालता वाबगावकर, रामदास कामत, सुधा करमरकर, डॉ. श्रीराम लागू , विक्रम गोखले, भक्ती बर्वे, अशोक सराफ या सर्व व इतर कलावंतांमुळे कलाविभागास एक वेगळे वलय प्राप्त झाले.
सांस्कृतिक उपक्रमा अंतर्गत संस्थेतर्फे कविवर्य पदमश्री बा .भ. बोरकर पुरस्कार, डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत प्रा. जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, डॉ.सुभाष भेंडे पुरस्कृत श्री. शशिकांत नार्वेकर पुरस्कार, ‘मास्टर दत्ताराम ‘चतुरस्त्र कलावंत पुरस्कार’ , श्री अ. ना. म्हाम्बरो पुरस्कार प्रदान केले जातात. याचबरोबर, संस्था संगीताच्या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण पण करते.
श्री व्यंकटेश ना. नाईक, श्री रुद्राजी केंकरे आणि इतर अगणित कार्यकर्त्यांच्या सेवेमुळे संस्था आपली विविध उद्दिष्टे पुरी करू शकली.
संस्थेची इतर कार्ये
फोन्डा या संस्थेतर्फे उभारलेल्या ‘दिलासा’ या रोग्यांचे दु:खशमन करणाऱ्या व काळजी घेणाऱ्या सेंटरला द गोवा हिंदू असोसिएशनने ५ लक्ष रुपयांची देणगी दिली असून त्या सेंटर मधे एका कक्षाला द गोवा असोसिएशन नाव दिले गेले आहे. तसेच गेली पाच वर्षे दिग्दर्शक कै. दामू केंकरे नाट्योत्सव’, मुंबई मराठी साहित्य संघ आणि द गोवा हिंदू असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने केला जातो. त्याला पण द गोवा हिंदू असोसिएशनने ५ लक्ष रुपयांची देणगी दिली आहे.
शतक महोत्सवी सोहळाया शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या कार्यकारिणीने वर्षभर कार्येक्रम करण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी आतापर्यंत ४ कार्येक्रम पार पडले आहेत. २५ ऑगस्ट, २०१८ ला यशवंत नाट्य-मंदिर माटुंगा, येथे शुभारंभाच्या कार्येक्रमात ‘शतक – नाट्यधारा हा द गोवा हिंदू असोसिएशन कलाविभाग निर्मित नाटकांवर आधारित कार्येक्रम सादर करण्यात आला. पंडित अरविंद पिळगावकर यांनी या कार्येक्रमांचे सादरीकरण केले.
दुसरा ‘ज्ञात-अज्ञात गोमंतकीय कलाकार ‘ हा कार्येक्रम, २५ ऑक्टोबर २०१८ ला दादर- माटुंगा कलचरल सेंटर येथे डॉ. सुरेश चांदवणकर यांनी सादर केला.
गोमंतक रत्न हा कार्येक्रम अभय कुलकर्णी आणि ‘ पंचमीच्या कलाकारांनी सादर केला. चौथा कार्येक्रम २० एप्रिल, २०१९ ला रवींद्र भवन, मडगाव-गोवा येथे नाट्यदर्पण हा नाट्यगीतावर आधारित कार्येक्रम सादर करण्यात आला.आता शेवटचा आणि शतकपूर्ती सांगता सोहळ्याचा पूर्ण दिवसाचा कार्येक्रम २५ ऑगस्ट २०१९ ला दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे होईल. पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे कार्येक्रमाचे अध्यक्षपद भुषवतील तर पदमभूषण डॉ. नंदकिशोर लाड हे सन्माननीय पाहुणे असतील. यावेळी श्री मोहनदास सुखटणकर, श्रीमती सुमन तुलसियांनी, पंडित अरविंद पिळगावकर डॉ. अनिल कारापुरकर आणि श्री अशोक सराफ यांना द गोवा हिंदू असोसिएशन चे मानद सदस्यत्व देऊन सन्मानित केले जाईल. त्याचप्रमाणे, पदमभूषण, डॉ. नंदकिशोर लाड ‘Orthopedic complications related to ageing’ या विषयावर
तर ‘Innovation a way of life’ या विषयावर पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर भाषण करतील. नंतरच्या सत्रात, १० ऑगस्ट २०१९ ला दादर माटुंगा कल्चरल सेंटरला घेतल्या जाणाऱ्या गायन स्पर्धेचे विजेते या कार्येक्रमाच्या दरम्यान आपली गायनकला सादर करतील. त्यानंतर ‘हवामान बदल आणि आपण ‘ या विषयावर – डॉ. नंदिनी देशमुख आपले विचार मांडतील. तसेच गोमंतकीय लोककलेची झलक दाखवणाऱ्या ‘गोफ’ आणि ‘दशावतारी काला’ या कलांचे सादरीकरण गोमंतकीय कलाकारांकडून होईल. कार्येक्रमाच्या शेवटी १७ ऑगस्ट २०१९ ला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती एकांकिका या कार्येक्रमाच्या दरम्यान सादर केली जाईल व त्यानंतर कार्येक्रमाची आणि शतक महोत्सवी वर्षाची सांगता होईल.याशिवाय एखाद गाव दत्तक घेण्याचा विचार आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे सांस्कृतिक विभागाचे कार्य वाढवायचे आहे, ते म्हणजे प्रायोगिक नाटकांना सहकार्य करायचे आहे. आज अविष्कार सारखी नाट्यसंस्था १९७१ पासून कार्यरत आहे. अरुणकाका काकडे यांच्या मेहनतीने वाढलेली संस्था, त्यांच “भूमिकन्या
सीता” हे नाटक द गोवा हिंदू असोसिएशनच्या सहयोगाने सादर करण्याचा मानस आहे. मामा वरेरकरांच हे चार अंकी संगीत नाटक असून त्याची रंगाकृती दिग्दर्शक विश्वास सोहनी यांनी अप्रतिम केलेली आहे. त्यामध्ये मानसी कुलकर्णी या सीतेची भूमिका करतात. हया नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा मानस आहे.











































