जनसंपर्क न्यूज – पुणे – “जगात टेलिकॉमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याच प्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणार्‍या पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात दुसर्‍या क्रमांकावर आहे.” असे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलपती व सुप्रसिध्द संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले.
 एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटच्या ११व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.  
कॅबेज सॉफ्टवेअरच्या बीआय सीओईचे प्रमुख श्री. संजय पटवर्धन व भारती एअरटेल लि.च्या आसाम आणि ईशान्य मंडलाचे सीटीओ श्री. कौशिक गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रोहोस्ट डॉ. श्रीहरी होनवाड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी.आपटे व मिटसॉटचे प्रकल्प संचालक प्रा.डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“टेलिकॉमचा कल्पनातीत वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात, किंबहुना प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास १०० वर्षे लागत असतील तर तोच बदल आता १० वर्षात होतो. विशेषकरून उगवती पिढी या बाबतीत अतिशय वाकबगार आहे. स्मार्ट फोन सारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे. पुढील काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नक्की काय घडामोडी घडतील याचा अंदाजसुध्दा करता येत नाही. भारताने सॉफ्टवेअरसारख्या सेवा क्षेत्रात कमीतकमी वेळात निर्यात करावयास सुरूवात केली आहे. आणि ही प्रक्रिया पुढेही तशीच चालू राहिल.  .”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“आज आपण टेलिकॉम मॅनेजमेंटची पदवी संपादन केली आहे. चारित्र्य आणि शिस्त या दोन गोष्टी आपल्या जीवनात उतरविल्यास तुमचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. २१व्या शतकात भारत विश्‍वगुरु बनेल हे स्वामी विवेकानंदांनी केलेले भाकित सत्यात उतरवायचे असेल, तर नव्या पिढीला कसून प्रयत्न करावे लागतील.”
संजय पटवर्धन म्हणाले,“तुम्ही आता टेलिकॉमची पदवी संपादन केलेली आहे. त्यातून तुम्ही नवनवीन कल्पना वापरून प्रकल्प तयार केले पाहिजेत. जेणेकरून त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी होईल. तुम्ही दुसर्‍यांचे प्रेरक बनले पाहिजे. त्याचप्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे. बदल हा सर्वांच्या एकत्रीकरणामुळे होऊ शकतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे व त्याप्रमाणे आपली पुढील वाटचाल करावी.”
प्रा.डॉ मिलिंद पांडे म्हणाले,“आपल्या जीवनात स्वल्पविरामला फार महत्त्वाचे स्थान आहे. कारण स्वल्पविराम म्हणजे अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.”
यावेळी १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि १०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हजर राहुन पदवी ग्रहण केली. मिटसॉटच्या ९ विभागातील ३० विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रा.डी.पी.आपटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.जयदीप जाधव यांनी आभार मानले.