जनसंपर्क न्यूज – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने भारतीय चित्रपटाचे जनक स्व दादासाहेब फाळके यांचा जयंती उत्सव सालाबादा प्रमाणे साजरा केला गेला। यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सचिव सुशांत शेलार, सह सचिव विजय खोचिकर,संचालक सतीश रणदिवे, संचालक सतीश बिडकर, संचालक शरद चव्हाण, संचालिका वर्षा उजगावकर, संचालिका चैताली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच याप्रसंगी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या जयंती प्रसंगी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी स्व दादासाहेब फाळके यांच्या महान कार्याचा गौरव करीत, त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला। स्व फाळके आपल्या सर्वांसाठी भली मोठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे, मा राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा माहिती मासिक अंक चित्रशारदाचे प्रकाशन जेष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन रुपात असलेला हा अंक मराठी सिनेसृष्टीसाठी खूपच उपयुक्त असल्याचे तसेच महामंडळाने गेल्या 3 वर्षात केलेल्या सर्व कामाबद्दल सरचिटणीस सुशांत शेलार यांनी सांगितले. तसेच यावेळी *चित्रशारदा* चे कार्यकारी संपादक दिलीप ठाकूर व व्यवस्थापकीय संपादक सौ अश्विनी यांना संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्व दादासाहेब फाळके यांची नात वृंदा व जावई पुसाळकर उपस्थित होते. हिंदमाता येथील स्व दादासाहेब फाळके यांच्या पुतळा व सभोवतालच्या परिसराचे महापालिके तर्फे सुशोभीकरण करण्यात येत असल्याने स्थानिक नगरसेवकांचे ह्यावेळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाने आभार व्यक्त केले.
ह्या जयंती उत्सवा सोबत स्व फाळकेंचा 150वा जयंती वर्षे सुरू झाल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा प्रगतीचा आलेख चढत असल्याने संपूर्ण महामंडळाच्या सभासदांनी ह्यावेळी समाधान व्यक्त केले।
ह्याप्रसंगी शेकडो चित्रकर्मी, कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, चाहते तसेच नागरिक उपस्थित होते.