Home महाराष्ट्र भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण; छावा संघटनेचा...

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण; छावा संघटनेचा इशारा

174

जनसंपर्क न्यूज | मुंबई प्रतिनिधी – भ्रष्टाचार व अन्यायाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत अखिल भारतीय छावा संघटनेने बालाजी पाटील चाकूरकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे यांनी शासनाला कठोर इशारा देत शेतकरी व गोरगरीब नागरिकांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

चिंचोळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विहिरी, गोटे तसेच घरकुल योजनांमधून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांची मुळे उपटून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवेदनानंतरही संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून निलंबन करण्यात आले नाही, तर मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही भ्रष्टाचाराविरोधातील लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत, शेतकरी व गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.