जनसंपर्क न्यूज – हणबरवाडी ( मसूर ) प्रतिनिधी – : वाढदिवस म्हणजे केक, फटाके आणि अनावश्यक खर्च अशी सध्याची प्रथा असताना सातारा पोलीस दलातील व सध्या मल्हार पेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सिद्धनाथ शेडगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांनी वाढदिवसावरील अनावश्यक खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद शाळा, हणबरवाडी येथील १०० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर व अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी विशेष कौतुक केले

कार्यक्रमाला सिद्धनाथ शेडगे यांच्या यांच्या मातोश्री लता शेडगे, चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, शाळेचे मुख्याध्यापक शेलार, शिक्षक चव्हाण सर, शिक्षिका वरुडे, पाडेकर, शिंदे मॅडम, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सिद्धनाथ शेडगे म्हणाले, “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाचे काहीतरी ऋण फेडण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी छोटासा हातभार लावता आला, याचे समाधान वाटते. प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या क्षणात समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा.”
चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले, “समाजातील प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासारख्या आनंदाच्या दिवशी गरजूंना मदतीचा हात दिला तर अनेक मुलांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळू शकते. सिद्धनाथ यांनी सुरू केलेला हा उपक्रम इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
लता शेडगे यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “माझ्या मुलाने स्वतःचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य दिले, याचा मला आई म्हणून अभिमान आहे. शिक्षणासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याने आयुष्यभर समाजसेवेची ही वाट कायम ठेवावी, हीच माझी इच्छा आहे.”

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे आजही शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची कमतरता आहे. अशा परिस्थितीत सिद्धनाथ शेडगे यांनी वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचा घेतलेला निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. एका वहीतून, एका पेनमधून आणि एका छोट्याशा मदतीतून एखाद्या विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात होऊ शकते, हा संदेश त्यांच्या उपक्रमातून अधोरेखित झाला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील प्रत्येकाने अशाच पद्धतीने हातभार लावला, तर ज्ञानाची ही ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित होऊन अनेक स्वप्नांना नवी भरारी मिळेल.











































