वेब सिरीज परीक्षण
ओटीटीच्या युगात प्रेक्षकांना वेगवान आणि खिळवून ठेवणारी कथा अपेक्षित असते. अशा वेळी ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सिरीज एक वेगळा विषय आणि भावनिक आशय घेऊन समोर येते. पात्रांची मांडणी, छायांकन आणि वातावरणनिर्मिती प्रभावी असली तरी पटकथेच्या मांडणीत काही गंभीर त्रुटी जाणवतात.

या सिरीजमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे सतत वापरण्यात आलेली पास्ट–प्रेझेंट–पास्ट–प्रेझेंट अशी फ्लॅशबॅकची रचना. कथा पुढे सरकण्याऐवजी वारंवार भूतकाळात जात असल्याने प्रेक्षकांचा कथेशी असलेला ताळमेळ तुटतो. काही वेळानंतर नेमके काय वर्तमानात घडते आहे आणि काय आठवणीत दाखवले जात आहे, हे समजून घेण्यासाठी अतिरिक्त लक्ष द्यावे लागते. परिणामी कथानकाचा नैसर्गिक प्रवाह कमी होतो.

याशिवाय, संपूर्ण वेब सिरीज अत्यंत संथ गतीने पुढे सरकते. अनेक प्रसंग अनावश्यकपणे लांबवले गेले असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे सुरुवातीला उत्सुकता निर्माण करणारी कथा पुढे जाताना काही प्रमाणात कंटाळवाणी वाटू लागते. संपादन अधिक नेमके आणि गतीमान असते, तर हीच कथा अधिक प्रभावी ठरू शकली असती.

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी, थ्रिलर आणि अॅक्शनप्रधान वेब सिरीजचा मोठा भरणा दिसतो. त्यामानाने निखळ प्रेमकथा मांडणाऱ्या वेब सिरीज फारच कमी पाहायला मिळतात. ‘मुसाफिर कॅफे’ या दृष्टीने वेगळी ठरते. प्रेम म्हणजे नेमके काय, प्रेमात माणूस इतका का गुंततो आणि ज्या नात्याची सुरुवात आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव म्हणून होते, तेच नाते काही प्रसंगी दुःख, वेदना आणि निराशेचे कारण कसे बनते, याचा विचार ही सिरीज प्रेक्षकांना करायला भाग पाडते. प्रेम ही केवळ भावना नसून त्यात विश्वास, समजूतदारपणा, संयम आणि वास्तवाची जाणीव तितकीच आवश्यक असते, हा संदेशही यातून उमटतो. म्हणूनच केवळ भावनांच्या भरात डोळे झाकून प्रेम करण्यापेक्षा, समोरच्या व्यक्तीला समजून घेत, वास्तव स्वीकारत डोळे उघडे ठेवून प्रेम करणे अधिक योग्य ठरते, हा विचार या कथेतून प्रभावीपणे पुढे येतो.
तथापि, कलाकारांचा अभिनय, संवादातील प्रामाणिकपणा आणि तांत्रिक बाजू समाधानकारक आहेत. भावनिक प्रसंगांमध्ये दिग्दर्शकाचा संवेदनशील दृष्टिकोन जाणवतो. कथा आणि संकल्पना निश्चितच चांगली आहे; मात्र तिच्या सादरीकरणात आवश्यक असलेली गती आणि स्पष्टता कमी पडते.
एकूणच, ‘मुसाफिर कॅफे’ ही आशयपूर्ण वेब सिरीज असली तरी सततचे फ्लॅशबॅक आणि संथ कथानक यामुळे तिचा प्रभाव अपेक्षेइतका ठसठशीत राहत नाही. थोडी अधिक गती, संतुलित संपादन आणि सरळ कथनशैली असती, तर ही वेब सिरीज अधिक व्यापक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असती. प्रेमाच्या भावविश्वाकडे वास्तववादी नजरेने पाहण्यास भाग पाडणारी ही वेब सिरीज एकदा अवश्य पाहावी, मात्र तिच्या संथ गतीसाठी संयम ठेवण्याची तयारीही ठेवावी.
**
रामकुमार शेडगे














































