डॉ. के. एच. संचेती मेडी-रत्न पुरस्काराचा पहिला मान डॉ. कल्याण गंगवाल यांना

3

जनसंपर्क न्यूज – पुणे : मेडी-जैन डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या ‘डॉ. के. एच. संचेती मेडी-रत्न पुरस्कार’ या पुरस्काराचा पहिला मान ज्येष्ठ फिजिशियन डॉ. कल्याण गंगवाल यांना जाहीर करण्यात आला आहे. मेडी-जैन डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्योती संघवी, डॉ. जिग्नेश तासवाला आणि डॉ. पराग जैन यांनी याबाबत माहिती दिली.

वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व डॉ. के. एच. संचेती यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत डॉ. कल्याण गंगवाल यांची पहिल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अनेक दशकांपासून त्यांनी रुग्णसेवा, वैद्यकीय क्षेत्रातील प्राविण्य आणि आरोग्य व्यवस्थेच्या उभारणीत दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ९.०० वा संचेती हॉस्पिटल, छत्रपती शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारामुळे समाजाप्रती समर्पित सेवाभावाला नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.