३७० वर्षे जुना शिवकालीन पूल… आजही तितकाच अभेद्य !
सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला प्रतापगड हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार नाही, तर स्वराज्याच्या दूरदृष्टीचा, नियोजनशक्तीचा आणि उत्कृष्ट स्थापत्यकलेचा जिवंत इतिहास आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले आजचे ‘पार’ हे गाव पूर्वी ‘पार्वतीपुर’ या नावाने ओळखले जात होते. काळाच्या ओघात या गावाचे नाव ‘पार’ असे रूढ झाले. याच गावाजवळ कोयना नदीवर उभारण्यात आलेला शिवकालीन दगडी पूल आजही स्वराज्याच्या अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देत दिमाखात उभा आहे.

इतिहास संशोधकांच्या मते हा पूल प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात, म्हणजे इ.स. १६५६ ते १६५८ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने बांधण्यात आला असावा. प्रतापगड हा स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. गडाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य, सैन्याची ये-जा, रसद पुरवठा आणि दळणवळण सुरळीत राहावे यासाठी कोयना नदीवर मजबूत आणि टिकाऊ पुलाची आवश्यकता होती. ही गरज ओळखून महाराजांनी या पुलाची उभारणी केली. हा पूल म्हणजे स्वराज्याच्या व्यवस्थापन कौशल्याचा आणि विकासदृष्टीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
या पुलाची रचना त्या काळातील स्थापत्यशास्त्रातील उच्च दर्जाच्या ज्ञानाची साक्ष देते. सुमारे ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असलेला हा दगडी पूल पाच मजबूत आधारस्तंभांवर उभारलेला असून त्यावर चार भव्य कमानी बांधण्यात आल्या आहेत. पुलाची कमाल उंची सुमारे १५ मीटर आहे. विशेष म्हणजे नदीच्या उगमाकडून येणाऱ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाचा दाब कमी करण्यासाठी प्रत्येक आधारस्तंभाला पुढील बाजूस तिरपा, काटकोनी आकार देण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा वेग थेट खांबांवर आदळत नाही आणि पुलाची मजबुती कायम राहते. आजच्या आधुनिक पुलांमध्ये वापरले जाणारे हे तंत्रज्ञान त्या काळात वापरण्यात आले होते, ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे.
पुलाच्या खांबांची रचना षटकोनी आकाराची असून पुलाच्या पूर्वेकडील बाजूस हे खांब साधारणपणे दोन भाले एकत्र केल्यानंतर जो निमुळता आकार तयार होतो, अशा प्रकारे सुमारे पाच फूट बाय पाच फूट बाहेर काढलेले आहेत. त्यामुळे पुरातून वाहून येणारी मोठमोठी झाडे आणि झाडांचे ओंडके पुलाला थेट धडकत नाहीत; ती आधी या षटकोनी आकाराच्या खांबाला येऊन धडकतात, त्यानंतर दोन तुकडे होऊन सरळ पुलाला कोणतेही नुकसान न करता पुलाखालून वाहून जातात
या पुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बांधकामात आधुनिक सिमेंट किंवा लोखंडाचा वापर झालेला नाही. संपूर्ण पूल दगड आणि चुन्याच्या साहाय्याने उभारण्यात आला आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही या पुलाचा एकही दगड ढासळलेला नाही, कोणताही तडा गेलेला नाही. या बांधकामातील अचूकता, दर्जा आणि गुणवत्तेची ही सर्वोच्च साक्ष आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे एक फूट उंच दगडी कठडे बांधण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून तयार करण्यात आलेले हे कठडे त्या काळातील स्थापत्यकारांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. मजबूत रचना, योग्य प्रमाण, जलप्रवाहाचा अभ्यास आणि सुरक्षिततेची काळजी या सर्व बाबींचा विचार करून हा पूल उभारण्यात आला होता.
आज आपण ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या शंभर ते दीडशे वर्षे जुन्या पुलांचे कौतुक करतो. मात्र प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा असलेला हा शिवकालीन पूल ३७० वर्षांहून अधिक काळ पावसाचे प्रचंड प्रवाह, पूर, नैसर्गिक आपत्ती आणि बदलत्या हवामानाचा सामना करूनही हा पूल आजही तितक्याच मजबुतीने उभा आहे. त्याचा एकही दगड निसटलेला नाही, ही बाब स्वराज्याच्या स्थापत्य परंपरेचे सामर्थ्य अधोरेखित करणारी आहे.
प्रतापगडाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात; मात्र या ऐतिहासिक पुलाकडे फार कमी लोकांचे लक्ष जाते. प्रत्यक्षात हा पूल केवळ नदी ओलांडण्याचे साधन नसून स्वराज्याच्या प्रशासनाची, नियोजनाची, स्थापत्यशास्त्राची आणि अभियंत्रिकी कौशल्याची अमूल्य स्मृती आहे. इतिहासप्रेमी, संशोधक, स्थापत्य अभियंते आणि विद्यार्थ्यांसाठी हा पूल अभ्यासाचा महत्त्वपूर्ण विषय ठरू शकतो.
आज या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पुलाजवळ माहिती फलक उभारणे, त्याचा इतिहास पर्यटकांपर्यंत पोहोचवणे, पुरातत्त्वीय संवर्धन करणे आणि पर्यटनाच्या नकाशावर त्याला योग्य स्थान मिळवून देणे आवश्यक आहे. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची ही अमूल्य ठेव पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा असलेला ‘पार’चा हा दगडी पूल केवळ दगडांचा समूह नाही; तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, स्वराज्याच्या विकासदृष्टीचा आणि मराठी स्थापत्यकलेच्या अद्वितीय परंपरेचा जिवंत पुरावा आहे. शतकानुशतके काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेला हा पूल आजही प्रत्येकाला एकच संदेश देतो—दर्जेदार नियोजन, प्रामाणिक काम आणि राष्ट्रहिताची भावना यांवर उभारलेली निर्मिती काळालाही हरवू शकते.
लेखन – रामकुमार शेडगे















































