बुलडोझरसमोर पहिला मीच उभा राहीन” – आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा

56

जनसंपर्क न्यूज – पुणे : लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पावरून लोकमान्य नगरचा विषय चांगला तापला आहे. यामध्ये आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते व विधीमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी थेट उडी घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या स्थगितीवर त्यांनी तीव्र आक्षेप घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकमान्य नगर येथे आयोजित बैठकीत आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांना ठाम पाठिंबा दर्शवला. “मी लोकमान्य नगर वासियांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. स्थानिक आमदाराने शिफारस केली आणि लगेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली. हा निर्णय संशयास्पद असून नागरिकांवर अन्याय करणारा आहे,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाले. “भविष्यात जर या ठिकाणी जबरदस्तीने बुलडोझर फिरवण्यात आला, तर त्या बुलडोझरसमोर पहिल्यांदा मी स्वतः उभा राहीन. लोकांच्या घरांवर, त्यांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. सरकारने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लोकमान्य नगरच्या नागरिकांसोबत राहणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, या आंदोलनात सहभागी असलेले ॲड. गणेश सातपुते यांनीही सरकारवर कडाडून टीका केली. “लोकमान्य नगरच्या नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्कांवर गदा येऊ देणार नाही. सरकारने तातडीने नागरिकांशी संवाद साधून आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे,” असे ते म्हणाले.

सातपुते यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त करत सांगितले की, “नागरिकांचा संताप हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. लोकांना अंधारात ठेवून निर्णय घेण्यात येत आहेत. जर गरज पडली, तर पुढील काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू.” यावेळी लोकमान्य नगर येथील रहिवासी त्यांच्या कुटुंबासहित मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर लोकमान्य नगर बचाव कृती समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.

साडेसोळा एकर कुणाच्या घशात? पुण्यात ‘छोटा अडाणी’ बनवण्याचा डाव उधळून लावू” – आदित्य ठाकरे

“मुंबईत जसं सरकारने मोठमोठे प्रोजेक्ट अडाणीच्या घशात घातले, तसंच पुण्यात आता ‘छोटा अडाणी’ कोणाला बनवायचा प्रयत्न सुरू आहे का, हा प्रश्न आहे. लोकमान्य नगरचा साडेसोळा एकरचा मौल्यवान भूखंड कुणाच्या घशात घालण्याचा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. लोकांच्या हक्कांवर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न आम्ही रस्त्यावर उतरून, जनतेच्या ताकदीने उधळून लावू.”