रामकुमार शेडगे – चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील वास्तवावर भाष्य करणारे प्रभावी माध्यम आहे. दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’ हा मराठी चित्रपट फोटो जर्नलिझमच्या जगात काम करणाऱ्या छायाचित्रकारांसमोर उभ्या राहणाऱ्या नैतिक प्रश्नांचा संवेदनशील वेध घेतो. व्यावसायिक कर्तव्य आणि मानवी मूल्ये यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकाला अंतर्मुख करतो.

चित्रपटाची कथा अनुभवी फोटो जर्नलिस्ट चंद्रू पानसरे (नागराज मंजुळे) आणि नवखा छायाचित्रकार सिद्धार्थ देशमुख (अमेय वाघ) यांच्या भोवती फिरते. महाराष्ट्रात झालेल्या भीषण भूकंपाचे वृत्तांकन करताना त्यांच्यासमोर एक कठीण प्रश्न उभा राहतो—समोर घडणारे दुःख कॅमेऱ्यात टिपायचे की संकटात सापडलेल्या माणसाला मदतीचा हात द्यायचा? याच नैतिक द्वंद्वातून चित्रपटाची कथा पुढे सरकते.
पत्रकाराकडे शब्दांची ताकद असते, तर फोटो जर्नलिस्टकडे एका छायाचित्रातून संपूर्ण वास्तव मांडण्याची जबाबदारी असते. एक प्रभावी छायाचित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक बोलके ठरू शकते, मात्र त्या एका फ्रेममागे असंख्य भावना, वेदना आणि कठोर निर्णय दडलेले असतात. ‘फ्रेम’ ही जाणीव अत्यंत प्रभावीपणे करून देतो.

नागराज मंजुळे यांनी अनुभवी फोटो जर्नलिस्टची भूमिका अत्यंत संयत आणि वास्तववादी पद्धतीने साकारली आहे. अमेय वाघ यांनी नवख्या छायाचित्रकाराची धडपड, शिकण्याची प्रक्रिया आणि भावनिक संघर्ष प्रभावीपणे उभा केला आहे. मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांनीही आपल्या भूमिका समर्थपणे साकारत कथेला आवश्यक भावनिक आधार दिला आहे.
दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी चित्रपटाला अनावश्यक नाट्यमयतेपासून दूर ठेवत वास्तववादी मांडणी केली आहे. छायांकन, दृश्यांची रचना आणि शांततेचा प्रभावी वापर चित्रपटाला वेगळी उंची देतो. अनेक प्रसंग संवादांपेक्षा दृश्यांतून अधिक प्रभावीपणे बोलतात. हा चित्रपट कोणत्याही एका सत्य घटनेवर आधारित नसला, तरी फोटो जर्नलिस्टच्या आयुष्यातील नैतिक संघर्षाचे वास्तव प्रतिबिंब प्रामाणिकपणे दाखवतो.

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल कॅमेरा आहे. प्रत्येक घटना काही क्षणांत जगभर पोहोचते. पण त्या एका छायाचित्रामागे असलेली जबाबदारी, संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये काय असतात, याचा विचार ‘फ्रेम’ प्रेक्षकाला करायला भाग पाडतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ माध्यम क्षेत्रातील व्यक्तींनीच नव्हे, तर प्रत्येक संवेदनशील प्रेक्षकाने पाहावा असा आहे.
‘फ्रेम’ हा चित्रपट पत्रकारितेची नैतिकता, मानवी संवेदना आणि एका छायाचित्राची ताकद प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे. वास्तववादी आणि आशयघन चित्रपट आवडणाऱ्यांसाठी आणि मिडियामध्ये काम करण्यासाठी ‘फ्रेम’ हा नक्कीच आवडेल. ‘फ्रेम’ हा मराठी चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.

लेखक – दिग्दर्शक : विक्रम पटवर्धन
कलाकार : नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे, अक्षया गुरव,
प्रकार : सामाजिक, ड्रामा, फोटो जर्नलिझम
कुठे पाहाल? : ZEE5
वेळ – 1 तास 50 मिनिटे
लेखन : रामकुमार शेडगे














































