Home ताज्या घडामोडी वाकड पोलिसांची मोठी कारवाई; अट्टल घरफोड्या गुन्हेगारासह चार जण अटकेत, १०.३४ लाखांचा...

वाकड पोलिसांची मोठी कारवाई; अट्टल घरफोड्या गुन्हेगारासह चार जण अटकेत, १०.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

41

जनसंपर्क न्यूज – पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास त्याच्या तीन साथीदारांसह अटक करत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सुमारे १० लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये ९७.८५ ग्रॅम सोन्याचे दागिने, जप्त करण्यात आले आहेत.

वाकड येथील उत्कर्ष चौक परिसरातील एका बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करत सुमारे ७.२० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना वाकड पोलिसांनी फ्लॅट बंद असलेल्या दहा दिवसांच्या कालावधीतील घटनास्थळ व परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपीच्या येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित करून त्याचे स्पष्ट फुटेज विकसित करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे अतुल ऊर्फ आट्या चंद्रकांत आमले (वय ३०, रा. वारजे, पुणे) याला १७ जुलै २०२६ रोजी वाकड येथील इराणी कॅफेजवळ अटक करण्यात आली.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे तीन साथीदार मोहन ऊर्फ आबा जनार्दन गुजमुले (वाकड), भीमराव बाबुराव गंगावणे (वाकड) आणि रामेश्वर लिंबाजी उपल्ले (मूळ रा. लातूर) यांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली.

पोलिसांनी चौघांकडून वाकड पोलीस ठाण्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणत ९७.८५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एकूण १०.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुख्य आरोपी अतुल ऊर्फ आट्या आमले हा सराईत घरफोड्या गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर जिल्ह्यांत एकूण ४४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस हवालदार वंदू गिरे यांच्यासह तपास पथकाने केली. या आरोपींकडून पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील आणखी घरफोड्यांचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.