किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवरील दबावाचे आरोप ?

7

जनसंपर्क न्यूज – पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून खटल्यात साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत साक्षीदारांनी गोळीबाराची धमकी, साक्ष बदलण्यासाठी दबाव, मध्यरात्री घर गाठून धमकावणे तसेच पोलिस संरक्षण काढून घेतल्याचे आरोप केले. यावेळी किशोर आवारे यांच्या हत्येसाठी २० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावाही करण्यात आला.

किशोर आवारे यांची १२ मे २०२३ रोजी तळेगाव नगरपरिषदेसमोर गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणाचा सत्र खटला क्रमांक ५४/२०२३ वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब खटल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या साक्षीदारांना सातत्याने पोलिस संरक्षण देण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

प्रकरणातील साक्षीदार मोहसीन मुलाणी यांनी किशोर आवारे यांच्या हत्येपूर्वी कटाची माहिती मिळाल्याचा तसेच त्याबाबत आवारे यांना सावध केल्याचा दावा केला आहे. पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपानुसार, सुधाकर शेळके यांनी आपल्या समोर किशोर आवारे यांना मारण्यासाठी २० लाख रुपये दिल्याचा दावा मोहसीन मुलाणी यांनी केला. त्यानंतर आपला जबाब बदलण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

आकाश जगताप हे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, घटनेच्या वेळी त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपानुसार, संदीप गराडे यांनी आकाश जगताप यांना बोलावून त्यांच्या डोक्याला बंदूक लावली आणि साक्ष देऊ नये, अशी धमकी दिली. उलटतपासणीदरम्यान आपल्यावर साक्ष देऊ नये म्हणून दबाव आणण्यात आला तसेच बंदुकीचा धाक दाखविण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितल्याचा उल्लेख प्रसिद्धीपत्रकात आहे.

अनिल पवार यांनी आपले पोलिस संरक्षण काढून घेण्यात आल्याचा आरोप केला. तसेच राजकीय पदाचा गैरवापर करून आपल्यावर मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय संदीप गराडे यांनी फोन करून ‘आमदार, मंत्री होईल, कशाला वादात जाता…’ अशा आशयाचे बोलून धमकावल्याचा आरोप पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

अनिल पवार यांच्यावर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना या कारवाईबाबत निरीक्षण नोंदविल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.

दत्तात्रय पारगे यांनीही साक्ष बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात आले. जानेवारी २०२६मध्ये काही व्यक्तींनी आपल्याला एका ठिकाणी नेऊन खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला, तसेच ३० मार्च रोजी मध्यरात्री घर गाठून धमकी दिल्याचा दावा त्यांनी केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. त्यानंतर काही साक्षीदारांना चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

मिलिंद अच्युत यांनीही आपल्याला धमकी मिळाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत साक्षीदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणण्यात आला. साक्षीदारांना धमक्या देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, महत्त्वाच्या साक्षीदारांना सातत्याने पोलिस संरक्षण द्यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस आकाश जगताप, मोहसीन मुलाणी, अनिल पवार, मिलिंद अच्युत, दत्ता पारगे, निलेश पारगे, सुनिल करंडे आदी उपस्थित होते.

या प्रकरणातील २० लाख रुपयांच्या व्यवहाराचा दावा, धमक्यांचे आरोप, पोलिस संरक्षण काढून घेतल्याचा आरोप तसेच मोक्का कारवाईबाबत करण्यात आलेले दावे हे संबंधित व्यक्तींनी केलेले आरोप आहेत. या आरोपांची स्वतंत्र न्यायालयीन पडताळणी होणे बाकी असून, संबंधित व्यक्तींची बाजू आणि न्यायालयीन निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.

या प्रकरणाची उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी २४ सप्टेंबर २०२६ रोजी, तर वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयातील पुढील सुनावणी १ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

फोटोओळ : पत्रकार परिषदेच्या वेळी डावीकडून आकाश जगताप, मोहसीन मुलाणी, अनिल पवार, मिलिंद अच्युत, दत्ता पारगे, निलेश पारगे, सुनिल करंडे आदी.