‘चित्रपट परीक्षण – भारतीय चित्रपटसृष्टीतील सहज, संवेदनशील आणि अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये आर. माधवन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. रोमँटिक नायकापासून गंभीर, चरित्रप्रधान भूमिकांपर्यंत त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला आपल्या नैसर्गिक अभिनयाची वेगळी छाप दिली आहे. *‘रहना है तेरे दिल में’*मधील मॅडी, *‘3 इडियट्स’*मधील फरहान आणि *‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’* मधील नांबी नारायणन असे त्याचे अनेक चित्रपट आहेत. त्यातील भूमिका त्यांच्या अभिनयवैविध्याची साक्ष देतात. अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

याच अभिनयप्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘जीडीएन’. भारताचे ‘एडिसन’ म्हणून ओळखले जाणारे महान संशोधक, अभियंता आणि उद्योगपती गोपाळस्वामी दोराईस्वामी नायडू यांच्या जीवनावर आधारित हा चरित्रपट केवळ एका व्यक्तीची यशोगाथा सांगत नाही, तर जिज्ञासा, जिद्द, संघर्ष आणि नवकल्पनांच्या सामर्थ्याची ओळख करून देतो.
कोइम्बतूरमधील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जी. डी. नायडू यांच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत विलक्षण होता. औपचारिक शिक्षणाच्या मर्यादा असूनही यंत्रांविषयी असलेली त्यांची प्रचंड उत्सुकता आणि शिकण्याची जिद्द त्यांना संशोधनाच्या दिशेने घेऊन जाते. भारताची पहिली स्वदेशी इलेक्ट्रिक मोटर विकसित करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे उद्योगविश्वातही मोठ्या उंचीवर पोहोचतो. युनिव्हर्सल मोटर सर्व्हिस (UMS) या बस वाहतूक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी उद्योगक्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. मात्र चित्रपट त्यांच्या यशावरच थांबत नाही. एखाद्या प्रतिभावान संशोधकाला आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचीही तो जाणीव करून देतो.

ब्रिटिश राजवटीतील अडथळे असोत किंवा स्वातंत्र्यानंतर आपल्या संशोधनाचे आणि शोधांचे संरक्षण करण्यासाठी कर अधिकाऱ्यांशी झालेला संघर्ष असो, नायडू यांच्या व्यक्तिमत्त्वातील जिद्द आणि स्वतंत्र विचारसरणी या प्रसंगांतून ठळकपणे समोर येते. चित्रपटाचा सर्वात मोठा आधार अर्थातच आर. माधवन आहे. त्यांनी साकारलेला जी. डी. नायडू हा केवळ एका ऐतिहासिक व्यक्तीचा पडद्यावरील आविष्कार वाटत नाही; त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव, बुद्धिमत्ता, महत्त्वाकांक्षा आणि भावविश्व समजून घेऊन साकारलेली भूमिका वाटते.

माधवन यांचा अभिनय विशेषतः संयमित आहे. व्यक्तिरेखेची बुद्धिमत्ता केवळ संवादांतून न दाखवता त्यांच्या देहबोलीत, नजरेत आणि संवादफेकीतून व्यक्त होते. भावनिक प्रसंगांतही ते अतिरेक टाळतात. त्यामुळे नायडू यांचे व्यक्तिमत्त्व अधिक नैसर्गिक आणि विश्वासार्ह वाटते. प्रियामणी, सत्यराज, जयराम आणि दुशरा विजयन यांनीही आपल्या भूमिका समर्थपणे साकारल्या आहेत. प्रमुख व्यक्तिरेखेभोवतीच्या नातेसंबंधांना आणि संघर्षांना आवश्यक भावनिक आधार देण्यात या कलाकारांचा वाटा महत्त्वाचा आहे.

दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांनी विषयाची मांडणी करताना नायडू यांच्या जीवनातील संशोधन, उद्योग आणि संघर्ष या तिन्ही बाजूंना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ घटनांची मालिका न राहता एका काळाचा आणि एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास बनतो. गोविंद वसंथा यांचे संगीत कथानकातील भावनिक क्षणांना पूरक ठरते. पार्श्वसंगीतामुळे काही प्रसंगांना अपेक्षित नाट्य आणि भावनिक परिणाम मिळतो.

‘जीडीएन’ची खरी ताकद त्याच्या विषयात आहे. औपचारिक शिक्षणाच्या मर्यादा असूनही स्वतःच्या जिज्ञासेच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे कार्य करू शकते, हा विचार चित्रपट प्रभावीपणे मांडतो. मात्र हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजनप्रधान नाही. चरित्रपटाच्या स्वरूपामुळे काही भाग माहितीप्रधान आणि संथ वाटू शकतात. वेगवान अॅक्शन, नाट्यमय ट्विस्ट किंवा पारंपरिक मसालापटाची अपेक्षा घेऊन जाणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटाचा वेग काहीसा कमी जाणवू शकतो. पण संशोधन, विज्ञान आणि व्यक्तिमत्त्वकेंद्रित कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा अनुभव अधिक अर्थपूर्ण ठरतो.

का पहावा…
‘जीडीएन’ हा केवळ एका संशोधकाचा चरित्रपट नाही; तो स्वप्न पाहण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारी कहाणी आहे. जी. डी. नायडू यांच्यासारख्या तुलनेने कमी परिचित पण विलक्षण कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची कथा मोठ्या पडद्यावर आणणे ही या चित्रपटाची महत्त्वाची जमेची बाजू आहे. आर. माधवन यांचा संयमी आणि प्रभावी अभिनय, समर्थ सहकलाकार, दिग्दर्शकीय मांडणी आणि प्रेरणादायी विषय यामुळे ‘जीडीएन’ लक्षात राहतो.
का पाहू नये…
चित्रपट काही ठिकाणी संथ होतो, पण त्यातून मांडला जाणारा विचार आणि व्यक्तिमत्त्वाची जिद्द प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवते. चित्रपटाची लांबी जवळपास पावणे तीन तास आहे. त्यामुळे काहींना तो कंटाळवाणा वाटू शकतो.
चित्रपट – जी डी एन
• लांबी: २ तास ३७ मिनिटे
• सेन्सॉर प्रमाणपत्र: U/A
• जॉनर: चरित्रात्मक नाट्य (Biographical Drama)
• दिग्दर्शक: कृष्णकुमार रामकुमार
• संगीत: गोविंद वसंथा
• प्रमुख कलाकार: आर. माधवन, प्रियामणी, सत्यराज, जयराम, दुशरा विजयन
• निर्मिती संस्था: Varghese Moolan Pictures
• भाषा: तमिळ (हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड डब आवृत्त्यांसह)
• OTT: Netflix
लेखन – रामकुमार शेडग












































