वॉव बुक फेअर’चे शनिवारी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन !

35

जनसंपर्क न्यूज – पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी रोडवर भव्य ‘वॉव बुक फेअर’ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यास विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक व इतिहास अभ्यासक संदीप तापकीर आणि ‘वॉव पब्लिशिंग्ज प्रा. लि.’च्या संपादक प्रेमा भटेवरा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात २० हजारांहून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध असणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील बालसाहित्य, कथा-कादंबऱ्या, ऐतिहासिक साहित्य, चरित्रे, आत्मचरित्रे, अध्यात्म, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्व-विकास अशा विविध विषयांवरील पुस्तके वाचकांना एकाच ठिकाणी पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त पुस्तके उपलब्ध असतील.

सोने, कपडे आणि सणासुदीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी रोडवर पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. डिजिटल युगात मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, मोबाईलच्या पलीकडे पुस्तकांशी मैत्री वाढवणे आणि कुटुंबासह पुस्तक खरेदीचा आनंद अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

२४ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते रात्री आठ अशी आहे. ‘लक्ष्मीच्या खरेदीसोबत, ज्ञानाचीही गुंतवणूक करा!’ या संदेशासह पुणेकरांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी, सदरील प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.