अजिंठा येथील लेण्यांना २०० वर्षे पूर्ण

419

जनसंपर्क न्यूज – औरंगाबादजवळील अजिंठामधील लेण्यांचा शोध लागून आज २८ एप्रिल रोजी २०० वर्षे पूर्ण झाली. जॉन स्मिथ या ब्रिटीश अधिकाऱ्यांनं या लेण्यांचा शोध घेतला. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८ , ९ , १० 12 , १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५ शे वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले. अजिंठ्यात एकंदर २९ लेण्या असून त्या बौध्दधर्मीय आहेत. तिथे ५ चैत्य आणि २४ विहार आहेत. ३० वी लेणी अर्धवट अवस्थेत असून इतर लेण्यांमधील कालात्मक अशा विविध प्रकारच्या चित्रांमधून त्या काळातील संस्कृती आणि सामाजिक गोष्टीचं रुप आपल्यासमोर उभे राहते. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली. ही लेणी जंगलांनी पूर्ण वेढली गेलेली असल्याने मानवाला अज्ञात राहिली आणि म्हणूनच ती टिकली असेच म्हणावे लागेल.