जनसंपर्क न्यूज – पानशेत प्रतिनिधी – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटक निवास पानशेत येथे ग्रामीण व जबाबदार पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सबलीकरण अंतर्गत शनिवार दिनांक 6 जुलै 2019 रोजी पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटक निवास पानशेत या परिसरामध्ये भात लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला.
हा भात लावणी महोत्सव पानशेत येथील कुरण गावामध्ये शेतकरी श्री.संतोष भाऊ ठाकर यांच्या शेतामध्ये करण्यात आला. या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी सहभाग घेतला. भात लावणी महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना भात लावणीची माहिती अवगत करण्यात आली. व यातून, पर्यटकांना वेगळाच आनंद मिळाला. हा महोत्सव साजरा करत असताना पर्यटकांकडून शेतकऱ्यांकरिता प्रतिव्यक्ती रु.50/- प्रमाणे मदत करण्यात आली. या वेळेस पर्यटकांनी शेती व शेतकऱ्यांविषयी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. या भात लावणी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक निवासात येणाऱ्या पर्यटकांना आपली सहल, पर्यटक निवासांची भेट अविस्मरणीय व मनोरंजन पूर्ण झाली. या भात लावणी विषयी पर्यटकांमध्ये आवड निर्माण व्हावी हा महामंडळाचा मानस असून हा भातलावणी महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा. उपमहाव्यवस्थापक श्री चंद्रशेखर जयस्वाल, नियंत्रण अधिकारी तथा विभागीय पर्यटन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यटक निवास व्यवस्थापक श्री.वैभव पाटील व सर्व कर्मचारी यांच्या कृतीतून हा महोत्सव साकार करण्यास परिश्रम घेण्यात आले.