भिडेवाड्यातील प्रकल्पग्रस्त व्यापाऱ्यांचा एल्गार

396

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन होताना भिडे वाड्यातील प्रकल्प बाधित व्यापारांना योग्य न्याय देऊन त्यांच्या पुनर्वसन करा अशी मागणी भिडेवाडा व्यापारी संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी भिडे वाड्यात पिढ्यान पिढ्या व्यवसाय करणारे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोक्याला काळ्याफिती, हातात बॅनर घेऊन मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आमचे पुनर्वसन झालेच पाहिजे अशा घोषणाबाजी करून व्यापाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी व्यापारी एम. आर. धाडगे, पोपट हिरजी शहा,  हसमुख हिरजी शहा, व्ही. व्ही. गोखले, अरविंद हिरजी, बाबूभाई सट्टची जडेजा, मुकेश सिंह भिवभा जडेजा आदी उपस्थित होते.

यावेळी व्यापारी म्हणाले की पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व समाज प्रबोधनाचे प्रणेते महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. या ऐतिहासिक भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे, परंतु या प्रकल्पात या भिडे वाड्याच्या जागेत आम्ही पिढ्यानपिढ्या व्यवसाय करीत आहोत. आमची दुकाने उध्वस्त करण्यात आली. त्यावेळी आम्हा व्यापाऱ्यांना दुकाने देऊन त्यांचे पुनर्वसन करू असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, अतुल सावे यांनी दिले होते.

मात्र या घटनेला नऊ महिने उलटून गेले तरी आमच्या सर्व व्यापाऱ्यांची महाराष्ट्र शासनाने तसेच पुणे महानगरपालिका आणि मंत्री महोदयांनी घोर निराशा केली आहे. आम्ही यात व्यापारी भरडले गेलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. भविष्यात आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र प्रमाणात आंदोलन करू.  यातून पुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आणि पुणे महानगरपालिकेची राहील असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.