Home ताज्या घडामोडी हणबरवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा

हणबरवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा

137

मसूर – हणबरवाडी येथे यंदा सलग चौथ्या वर्षी भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, त्यांच्या गडदुर्गांचे वैभव आणि इतिहास जनमानसात जपण्यासाठी हा उपक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे आयोजन चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि सातारा पोलीस दलातील सिद्धनाथ शेडगे यांनी केले होते.

या स्पर्धेत बालस्पर्धकांनी साकारलेले रायगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, मल्हारगड, सिंधुदुर्ग, तोरणा यांसारखे शिवकालीन किल्ले पाहून उपस्थितांचे डोळे दिपले. किल्ल्यांची साकारलेली बांधणी, सजावट आणि त्यामागील ऐतिहासिक माहिती यामुळे स्पर्धेचे स्वरूप केवळ खेळापुरते न राहता एक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम ठरला. यामध्ये मुलींनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकाचे सर्वोत्तम किल्ले निवडून त्यांच्या सादरीकरणासाठी स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच गतवर्षीच्या विजेत्यांनाही विशेष सन्मान देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतीशील शेतकरी अधिक दबडे, वंदना दबडे, तसेच गोरखनाथ शेडगे, लता शेडगे, सिद्धनाथ शेडगे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जयश्री शेडगे, सतीश देसाई, संतोष ढेरे, प्रकाश पवार, किशोर शेडगे, अरुण शेडगे, संदीप शेडगे, प्रणव साळुंखे, विजय शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे हणबरवाडीत पुन्हा एकदा शिवकालीन पराक्रमाचा झेंडा फडकला, आणि नव्या पिढीमध्ये स्वराज्याचा अभिमान जागृत झाला.

सिद्धनाथ शेडगे म्हणाले, की “छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांचा इतिहास हा फक्त दगड-मातीचा नव्हे, तर शौर्य, संघटन आणि स्वाभिमानाचा संदेश देणारा आहे. या किल्ला स्पर्धेमुळे मुलांमध्ये देशभक्ती, इतिहासाविषयी कुतूहल आणि स्वराज्याचा अभिमान जागा झाला आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी दबडे यांनी केले तर सूत्रसंचालन मधुरा शेडगे यांनी केले आणि आभार सिद्धनाथ शेडगे यांनी मानले.

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन देशप्रेम, शौर्य आणि संस्कार जपणं हीच खरी आदरांजली ठरेल – दिग्दर्शक रामकुमार शेडगे

“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा दैदिप्यमान वारसा आहे. त्यांच्या गडकोटांचा अनमोल ठेवा पुढच्या पिढीच्या मनात रुजवणे ही काळाची गरज आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन देशप्रेम, शौर्य आणि संस्कार जपणं हीच खरी आदरांजली ठरेल. महाराजांच्या गडदुर्गांनी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला. या किल्ला स्पर्धेमुळे मुलांमध्ये इतिहासाची आवड आणि देशभक्तीची भावना रुजत आहे.”