जनसंपर्क न्यूज – अंधारवाडी (ता. कराड) येथील सुपुत्र पारस गणेश पुजारी याने आपल्या जिद्द, मेहनत आणि देशभक्तीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. पुण्यातील एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे शिक्षण घेत असलेला पारस हा एन.सी.सी. (राष्ट्रीय छात्र सेना) चा कॅडेट असून, दिल्ली येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या आर.डी.सी. (प्रजासत्ताक दिन शिबिर) मध्ये पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या पीएम रॅलीसाठी त्याची पुणे व महाराष्ट्र राज्यातून निवड झाली आहे.
यंदा देशभरातून तब्बल २ लाख एनसीसी कॅडेट्समधून केवळ २,४०० कॅडेट्सची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्यातून १०० कॅडेट्सना संधी मिळाली आहे. या मानाच्या निवडीत पारसचा समावेश होणे हे त्याच्या अतूट परिश्रमांचे फलित आहे. याशिवाय नॅशनल एनसीसीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातील १०० कॅडेट्सपैकी फक्त पाच कॅडेट्स उत्तीर्ण झाले असून, त्या पाचांमध्ये पारसने स्थान मिळवून दुसरे महत्त्वाचे यश मिळवले आहे.
दिल्ली येथे होणारे हे शिबिर महिनाभर चालणार असून, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कॅडेट स्पर्धा, छोटे शस्त्र प्रशिक्षण तसेच प्रजासत्ताक दिन परेडमधील पथसंचलन यांचा समावेश आहे. या शिबिराला उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख भेट देणार आहेत. शिबिराची सांगता २८ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीने होणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे, सातारा आणि संपूर्ण महाराष्ट्रात पारस गणेश पुजारी याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.












































