Home ताज्या घडामोडी लोणावळ्यात लाच २५ हजारांची घेताना पोलिस जाळ्यात

लोणावळ्यात लाच २५ हजारांची घेताना पोलिस जाळ्यात

260

जनसंपर्क न्यूज – पिंपरी : लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २० हजारांची लाच स्वीकारताना सहायक पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने नारायणीधाम पोलिस चौकीत सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) ही कारवाई केली.

शकील मोहम्मद शेख (४५) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. गुन्ह्यात मदत करण्यासाठी शेख याने ४२ वर्षीय व्यक्तीकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान पडताळणी केली.

यामध्ये शेख याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी नारायणीधाम पोलिस चौकीत सोमवारी सापळा लावला. त्यात २० हजारांची लाच घेताना शेखला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त भारती मोरे पुढील तपास करत आहेत.