जनसंपर्क न्यूज – पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३१ (सांगवी–पिंपळे गुरव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ भक्तिभावाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. सांगवी येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात केली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार श्री. राजेंद्र शेठ जगताप, श्री. अरुण शेठ पवार, सौ. उमा शिवाजी पाडुळे तसेच सौ. जया बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. हा प्रचार शुभारंभ माझ्या तसेच माजी नगरसेवक कैलासबाबा बारणे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, माजी नगरसेविका शीतल विठ्ठल (नाना) काटे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी अनिल काटे तसेच सायली उमेश काटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सांगवी–पिंपळे गुरव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात भक्तीभाव, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनशक्तीचे दर्शन घडले.
या कार्यक्रमातून विकास, विश्वास आणि संघटनशक्तीचा ठाम संदेश देण्यात आला. प्रभाग ३१ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
जनतेच्या पाठिंब्याच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच यशस्वी वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग ३१ मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.











































