जनसंपर्क न्यूज -चिंचवड प्रतिनिधी – केशवनगर, चिंचवड येथील काकडे टाऊनशिप वसाहतीसमोर गेल्या तब्बल एक वर्षापासून अनधिकृतपणे घनकचरा, घाण, आरोग्यास हानिकारक माती, राडाराडा व रोढा खुलेआम टाकला जात आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक रहिवासी आजारी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्गंधी, डास व घाणीमुळे संपूर्ण परिसर अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित झाला आहे.

या प्रकरणी नागरिकांनी वारंवार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित पालिका अधिकाऱ्यांचा या गैरप्रकारात आर्थिक हातभार असावा, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वस्ती असतानाही असा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

आज महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन राडाराडा टाकणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांना जाब विचारला. यावेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, जर हा प्रकार तातडीने थांबवला गेला नाही, तर येत्या काळात नागरिकांचा उद्रेक अटळ आहे.

पुढील चार ते पाच दिवसांत संबंधित ठिकाणी कठोर कारवाई न झाल्यास सर्व रहिवाशांच्या वतीने अनोखे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व आयुक्तांनी त्वरित दखल घेऊन दंडात्मक कारवाई करावी, साचलेला सर्व राडाराडा हटवावा आणि भविष्यात येथे कोणतेही आरोग्यास हानिकारक काम होऊ नये, अशी ठाम मागणी मधुकर बच्चे यांनी दिलेल्या पत्रकात केली आहे.