निघोजे म्हाळुंगे – प्रतिनिधी – घरासाठी प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिंपरी-चिंचवड परिसरातील ११ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निघोजे परिसरात ‘शक्ती डेव्हलपर्स’’ या नावाखाली व्यवहार करणारे श्री ठाकुर प्रमोदसिंह जियालाल गडरेल आणि त्यांचे बंधू शाम जियालाल गडरेल ठाकूर यांनी २०१९ साली घराच्या प्लॉटसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतर खरेदीखत करून न देता “सर्व्हर बंद आहे”, “काम प्रलंबित आहे”, “मी परगावी आहे” अशी कारणे सांगून वारंवार टाळाटाळ करण्यात आली, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून फोन न उचलणे आणि दमदाटीची भाषा वापरण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या फसवणुकीत प्रदीप शिवाजीराव आदरकर, अंकुश दिलीप मठपती, संजीव शिवाजीराव दापके, रुपाली रेणुकेश्वर पिसे, रेणुकेश्वर भालचंद्र पिसे, दस्तगीर शेख, राजाबाबू छोटेलाल विश्वकर्मा, शाकीर अकबर शाह, नसीम रफीक उर्फ उसास, विनोद मेवालाल जयपाल आणि हरिप्रसाद विश्वकर्मा यांचा समावेश आहे. अनेकांनी घरातील दागिने विकून तसेच कर्ज काढून पैसे भरल्याचे सांगितले आहे.
पीडित सर्वजण कष्टकरी कामगार असून आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर तीव्र मानसिक ताण निर्माण झाला आहे. संबंधित व्यवहारांचे बँक स्टेटमेंट, पावत्या आणि व्हॉट्सअॅप चॅटिंगचे पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले असून फसवणूक झालेली रक्कम व्याजासह मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निघोजे म्हाळुंगे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फसवणूक झालेल्या नागरिकांनी आणि ॲड. जाधव आणि ॲड. दास यांनी पत्रकारांना अशी माहिती दिली.















































