पुणे ( किशोर गरड ) :- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे शाखा कार्यालयाचा उदघाटन समारंभ येत्या दहा ऑगस्ट रोजी,केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री मा.प्रकाश जावडेकर यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, सांस्कृतिक कार्यमंत्री मा.विनोद तावडे, पुण्यनगरीचे खासदार मा. गिरिषभाऊ बापट, महसूलमंत्री तथा पुण्यनगरीचे पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, पुण्यनगरी च्या महापौर मा.मुक्ताताई टिळक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच, प्रसिध्द कलाकार,तंत्रज्ञ आणि महामंडळाचे सभासद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
पुढे बोलताना भोसले म्हणाले की, “चित्रपट महामंडळाच्या स्वतःच्या मालकीची तीन कार्यालये सध्या घेतली आहेत. बऱ्याच प्रतीक्षे नंतर नवीन कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. त्याचबरोबर, विविध प्रश्नांवर सांस्कृतिक मंत्र्यांसोबत चर्चा करणार असून, लवकरच चित्रपट संमेलनाचे आयोजनही करणार असल्याचे” सांगितले. कार्यक्रमात मंत्री महोदय नवीन वास्तू चे उदघाटन करतील, नंतर कलाकारा सोबत संवाद साधणार आहेत. आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.मंदार जोशी, समारंभ समितीचे गिरीष कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.!

( फोटो ओळ- (डावीकडून) अ‍ॅड. मंदार जोशी, अध्यक्ष मेघराज राजेभोसले, गिरीष कोळपकर.)