वर्धन देवनाथन यांचे प्रतिपादनएमआयटी-एडीटीत मार्केटिंग कार्यशाळा

जनसंपर्क न्यूज – पुणे, ता. १० :- आजघडीला पारंपरिक बाजाराबरोबरच ऑनलाइन म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा पसारा वाढत चालला आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांकडे ब्रॅंडेड वस्तू उपलब्ध होत असून या क्षेत्रात करियर करण्याची देखील संधी वाढली आहे. जगातील कोट्यवधी लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. जगभरातील बहुतांश कंपन्या पारंपरिक बाजारपेठेच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना दुसरीकडे डिजिटल मार्केटिंगमधून उत्पादनाची जाहिरात करताना दिसून येतात. म्हणूनच या क्षेत्रात गुणवंत उमेदवारांची कंपन्यांना गरज भासू लागली आहे. आपणही या क्षेत्रात करियर करून डिजिटल युगाचे भागिदार होऊ शकता, असे प्रतिपादन यॅनफेंग इंडिया ऑटोमोटिव्ह इंटिरियर सिस्टमचे अध्यक्ष वर्धन देवनाथन यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम) तर्फे आयोजित तिसऱ्या मार्केटिंग कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, डॉ. विवेक सिंग, डॉ. छब्बी सिन्हा आदी उपस्थित होते.

वर्धन देवनाथन म्हणाले, डिजिटल मार्केटिंग सर्वात आव्हानात्मक उद्योगांपैकी एक आहे. बऱ्याच अंशी डिजिटल मार्केटिंग हे पारंपारिक मार्केटिंग यापेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगच्या पद्धती बदलल्या आहेत. आजकाल कंपन्याचा डिजिटल मार्केटिंगवर जास्त भर आहे, कारण मोबाइल फोन आणि लॅपटॉपचा वापर अधिक होत आहे. भविष्यात लॅपटॉप हे उपकरण नसले, तेव्हा ऑनलाईनसाईटस्‌ला अधिक महत्व येईल. तेव्हा विक्री करणे हाच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा राहिल. आपले प्रोडक्ट, सेवा किंवा ब्रँडबद्धल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी करता येईल याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी आतापासून करावा. विक्रीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा डिजिटल मार्केटिंगसाठी लागणारे कौशल्य आणि कामाचे स्वरूप वेगळे असते, ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.

प्रा. सुनीता कराड म्हणाल्या, माध्यमांचा विस्तार झपाट्याने होत आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. याचा फायदा आपल्या प्रोडक्टच्या ब्रँडिंगसाठी करता येईल का याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. मार्केटिंग हे मार्केटमध्येच राहून आत्मसात करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मार्केटचा अभ्यास करून आपली रणनिती आखावी.

कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी प्रस्ताविक केले. विद्यार्थी रोहित पवार आणि विधी कोथीवाल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. छब्बी सिन्हा यांनी आभार मानले.

फोटो ओळी

पुणे :- मार्केटिंग कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून करताना वर्धऩ देवनाथन, प्रा. सुनीता कराड, डॉ. सुनील राय.