हडपसर टीम या संस्थेचा अनोखा उपक्रम
पुणे – जनसंपर्क न्यूज – ( २६ फेब्रु ) वर्षभर आपण वेगवेगळे ‘डे’ साजरे करून आनंदाची अनुभूती घेणाऱ्यांना ‘हडपसर टीम’ या संस्थेने ‘रोटी डे’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. अन्नदानाच्या प्रक्रियेला व्यापक स्वरूप देणारा ‘रोटी डे’ १ मार्च रोजी हडपसरमध्ये मोठय़ा प्रमाणात केला जाणार असून या निमित्ताने हजारो गरजूंना, उपेक्षितांना एक वेळचे भोजन उपलब्ध करून देणार आहेत. अशी माहिती ‘हडपसर टीम’ने दिली आहे.
प्रेम डे, मैत्री डे, गुलाब डे असे विविध डे समाजात साजरे होत असतात. त्यात तरुण उत्साहाने सहभागी होत असतात. हे दिवस साजरा करणाऱ्या तरुणाईबरोबरच समाजातील सर्वांनीच सामाजिक भान बाळगून एक दिवस दुसऱ्याला अन्न द्यावे अशी ‘रोटी डे’मागील कल्पना आहे. त्यातूनच १ मार्च हा ‘रोटी डे’ म्हणून करण्याच्या कल्पनेची आखणी झाली.
या उपक्रमात भाग घेणाऱ्यांनी आपल्या जवळच्या कोणत्याही गरजूला रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी आणि भाजी किंवा चटणी जे शक्य असेल ते द्यावे. ज्या कोणाला अन्न द्यायचे आहे ते स्वच्छेने द्यायचे आहे. त्यामुळे ते कोणाला द्यायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. अन्न द्या एवढेच आवाहन करत आहोत, असे ‘हडपसर टीम’ रोटी डेने केले आहे.








































