नवी सांगवीत कप-बशीचा भावनिक पुनरागमन; पायल अमित पसरणीकरांना अधिकृत चिन्ह मिळताच उत्साहाचे वातावरण
जनसंपर्क न्यूज – नवी सांगवी : नवी सांगवी परिसरात “नवी सांगवीकर यांचा उमेदवार” अशी ठाम ओळख निर्माण केलेल्या पायल अमित पसरणीकर यांना प्रभाग क्रमांक ३१ (क) मधून कप-बशी हे निवडणूक चिन्ह अधिकृतपणे मिळाले असून, त्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
नवी सांगवीच्या सामाजिक व राजकीय इतिहासात अमिट ठसा उमटवणारे दिवंगत आमदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर कप-बशी चिन्ह मिळाल्याने, हा क्षण अनेक नागरिकांसाठी भावनिक ठरत आहे. २००९ च्या निवडणुकीत लक्ष्मणभाऊंना जनतेपर्यंत पोहोचवणारे हेच चिन्ह आज त्यांच्या विचारांशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पुन्हा एकदा प्रेरणास्थान ठरत आहे.

अमित पसरणीकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर नवी सांगवीतील नागरिक, आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले होते. “भाऊ, आता माघार नाही” असा ठाम संदेश देत नागरिकांनी निवडणूक रिंगणात ठाम राहण्याची भूमिका मांडली होती. त्या भावनांचा सन्मान राखत पायल अमित पसरणीकर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून, आता त्या कप-बशी चिन्हासह निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत.
कप-बशी हे केवळ निवडणूक चिन्ह नसून, ते निष्ठा, विश्वास आणि संस्कारांची परंपरा असल्याची भावना समर्थक व्यक्त करत आहेत. “लक्ष्मणभाऊ गेले असले तरी त्यांचे विचार, त्यांची लढाई आणि त्यांचे चिन्ह आजही जिवंत आहे,” अशा शब्दांत नागरिक आपली भावना व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर नवी सांगवीकरांनी लक्ष्मणभाऊंचा आशीर्वाद घेऊन कप-बशी चिन्हाला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, प्रभाग क्रमांक ३१ (क) मधील निवडणूक लढत अधिकच भावनिक आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.















































