जनसंपर्क न्यूज | पुणे : पुण्याचे माजी खासदार, ज्येष्ठ राजकीय नेते आणि क्रीडा क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम पाहिले. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.
‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पुण्याला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा विकासात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याने एक अनुभवी, प्रभावी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले असून, त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.















































