पक्षीय धोरणा विरोधी भूमिका कारणीभूत ; गणपत जाधव यांची प्रभारी म्हणून निवड
कणकवली-प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी पक्षीय धोरणाविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष पदावरून निलंबन करण्यात आले आहे. आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून कदम यांचे निलंबन केल्याची घोषणा आरपीआय सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक मधू मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
काही दिवसांपूर्वी आरपीआयचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून शिवसेना भाजप यांच्या सोबत असलेली आरपीआय ची युती तुटल्याचे जाहीर केले होते. युती सरकारने जिल्ह्यात आरपीआयला योग्य तो सन्मान दिला नाही तसेच आंबेडकरी जनतेची फसवणूक करण्याचे काम युती सरकारने केले असल्याचा आरोप या प्रसिद्धी पत्रकात केला होता. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आरपीआय जिल्हा निरीक्षक मधू मोहिते यांनी शिवसेना भाजप सोबत आरपीआयची युती तुटली नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष युती आघाडी मध्ये आहे. रतनभाऊ कदम यांनी युतीसोबत काडीमोड घेतल्याचे जाहीर केले असले तरीही असा कोणताही निर्णय केंद्रीय कमिटीने घेतलेला नाही. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाला पाठिम्बा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. असे असताना रतनभाऊ कदम यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार कदम यांचे निलंबन करण्यात येत असून कार्यकर्ते आणि अन्य युतीचे पक्ष यांनी आरपीआय जिल्हाध्यक्ष म्हणून रतनभाऊ कदम यांच्याशी औपचारिक संबंध ठेवू नये असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.











































