जनसंपर्क न्यूज – पाटण :  कोयना धरण परिसराला रविवार दि. 28 रोजी मध्यरात्री 12 वाजून 29 मिनिटांनी 3.5 रिस्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर झोपेत असणारे अनेक लोक भीतीमुळे घराबाहेर पडले. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती महसूल विभाग तसेच या भूकंपाचा कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान , हा भूकंपाचा धक्का पाटण, कोयना, पोफळीसह चिपळूण आदी ठिकाणी जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून 16.8 किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावाच्या नैऋत्य दिशेला 9 किलोमीटर अंतरावर होता. तर भूगर्भातील भूकंपाचे अंतर 11 किलोमीटर इतके होते.

या भूकंपाच्या धक्क्याने घरातील भांडी वाजू लागल्याने अनेकजण घराबाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्का बसल्याने लोकांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाची मालिका सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.