जावडेकरांच्या हस्ते महामंडळाच्या कार्यालयाचे उदघाटन
जनसंपर्क न्यूज – पुणे – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन केंद्रिय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी खासदार गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, अभिनेत्री वर्षा उसगावकर, जेष्ठ वात्राटिकाकार रामदास फुटाणे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले याच बरोबर चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील अनेक कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती.

या प्रसंगी बोलताना जावडेकर म्हणाले, की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कलाकार व तंत्रज्ञ यांच्या समस्या महामंडळाने सोडवायला पाहिजेत. चित्रपट कलाकार व तंत्रज्ञ हे उपेक्षित आहेत. ९१-९२ साली मराठी चित्रपटाना वाईट दिवस होते. श्वासपासून मराठी चित्रपटाने कात टाकली असून मराठीत सध्या नवीन येणारे चित्रपट व दिग्दर्शक उत्तम असून चांगले चित्रपट येत आहेत. यंदा सुध्दा राष्ट्रीय पुरस्कारावर मराठीतील चित्रपटांनी मोहर उठवली आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. जावडेकर पुढे म्हणाले की, मराठी चित्रपटाचा चढता आलेख कौतुकास्पद आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले की, चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन होते. यातून विविध विषय समाजाच्या समोर येतात. जुन्या कलावंतांचं एकत्रीकरण केलं पाहिजे. तसेच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, आज कलाकारांवर हलकी कामं करण्याची पाळी येते. महामंडळाने यांचे पुनर्वसन केले पाहिजे.
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी खासदार गिरीश बापटांच्या हस्ते महामंडळाच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, पूजा पवार, प्राजक्ता गायकवाड, स्मिता गोंदकर तसेच अभिनेते मोहन आगाशे, राहुल सोलापूरकर महामंडळाचे संचालक संजय ठुबे, सुशांत शेलार, चैत्राली डोंगरे, निकिता मोघे, अण्णा देशपांडे, महामंडळाचे कायदेशीर सल्लागार अॅड. मंदार जोशी, तसेच अण्णा गुंजाळ, गिरीश कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश पायगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले आणि आभार सुशांत शेलार यांनी मानले.











































