दादा काशीद यांच्याकडून (जनसंपर्क न्यूज ) पुणे – रंगीबिरंगी टोप्या, फुगे आणि खाऊचे पुडे बघून कामायनी संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू उमटले.
बालदिनाचे औचित्य साधून बहुचर्चित मराठी अबक चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी त्यांचा वाढदिवस कामायनी संस्थेतील मुलांसोबत साजरा गेला. रंगीबेरंगी फुगे, शुभेच्छा पत्रके, नक्षीदार टोप्या यावेळी मुलांनी डोक्यात परिधान केल्या होत्या.

हवेत फुगे सोडून यावेळी मुलांनी आनंद साजरा केला.मुलांना खाऊचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. कामायनी संस्थेचे व्यवस्थापक कालिदास सुपाते,सुजाता आंबे ,प्राचार्य आशा देशपांडे, संचालक नारायण शिंदे, श्रीलेखा कुलकर्णी, अभिनेते आशुतोष भोसले, उद्योजक वसंत अंबिके, सुरेश उकिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला रामकुमार शेडगे यांना कामायनी संस्थेतील विद्यार्थ्यांनी औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. शेडगे यांनी कामायनी संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अ.ब.क चित्रपटातील विविध अनुभव सांगितले. त्याच बरोबर मुलांना चित्रपटसृष्टीत विनोदी किस्से सांगून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी श्री शेडगे म्हणाले, माझ्या आगामी चित्रपटात कामायनी संस्थेतील काही विद्यार्थ्यांना मी काम करण्याची संधी देणार आहे.

कामायनी संस्थेचे व्यवस्थापक कालिदास सुपाते म्हणाले, चित्रपटसृष्टीत कलाकार व दिग्दर्शक मंडळी आमच्या संस्थेला अनेक वेळा भेट देत असतात. पण आज बालदिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी त्यांचा वाढदिवस आमच्या विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले त्या बद्दल आम्हाला खूप आनंद झाला.

यापुढेही प्रत्येक वाढदिवसादिनी श्री शेडगे यांनी आमच्या संस्थेस भेट देऊन, मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुनित करावा अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केले.


वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेतील मुलांना केक भरवताना रामकुमार शेडगे.











































