जनसंपर्क न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडण घडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अभिवादन सभेचे आयोजन केले होते. गेली १३ वर्ष अण्णाभाऊंच्या मुळगांव वाटेगांव ता. वाळवा जिल्हा सांगली येथून ज्योती पेटवून पुण्यापर्यंत आणली जात आहे. यंदाही ही क्रांतिज्योती मोठ्या दिमाखात अण्णा भाऊ साठे पुतळा सारसबाग या ठिकाणी आणली गेली. यावेळी या क्रांतिज्योतीचे पुष्पहारांनी व महिला लेझिम पथकाने सलामी देवून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ विचारवंत रतनलाल सोनग्रा, जलासा वैराट, मोहम्मद शेख, शिवाजी भिसे, राजाभाऊ शिंदे, आबा चव्हाण, आबा शिंदे, दत्ता कांबळे, दत्ता डाडर, हरीभाऊ वाघमारे, सुरेखा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
सबनीस म्हणाले की अण्णा भाऊंनी साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जनमानसात रुजवली होती. अण्णाभाऊंनी अनेक कथा कादंबऱ्या, पोवाडे लिहिले आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट तयार झाले असून त्यांचे साहित्य देश-विदेशात विविध भाषेत प्रकाशित झाले आहे अण्णाभाऊंचे साहित्यातील योगदान हे सर्वश्रेष्ठ आहे. अशा या लोकशाहीराला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे.
वैराट म्हणाले की यंदा झोपडपट्टी सुरक्षा दलाने साहित्यक्रांती ज्योत आंदोलन कार्यकर्त्यांनी प्रज्वलित करून आंदोलन छेडलेले आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून प्रयत्न करत आहे तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र शासनाने यावर्षीच भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा.
सोनाग्रा म्हणाले की भगवानराव वैराट आणि झोपडपट्टी सुरक्षा दल गेल्या एका तपापासून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा म्हणून झगडत आहे. त्यांनी मशाल क्रांतीज्योती माध्यमातून त्यांनी आंदोलन छेडले आहे. अशा या लोकशाहीराला भारतरत्न देऊन मान्य करावे अशी माझी आणि जनसामान्यांची देखील भावना आहे.








































